भारतीय वैमानिक अभिनंदन यांची उद्या सुटका, इम्रान खान यांची घोषणा
“आज पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली. ‘भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत. मात्र पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. तसंच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे मूळ हे काश्मीर आहे,’ असा दावाही इम्रान खान यांनी केला. “
पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. शुक्रवारी सकाळी वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली.
वडिलांनी मानले देशावासीयांचे आभार
विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश जारी केला होता. अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं होतं मानले की, ‘तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. देवाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे त्याबद्दल आभार…माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, व्यवस्थित आहे…किती धैर्याने तो बोलत आहे…एका खरा जवान…आम्हाला त्याचा अभिमान आहे’.
‘अभिनंदन सुखरुप घरी परत यावा यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत असतील याची खात्री आहे. त्याच्यावर अत्याचार होऊ नयेत यासाठी प्रार्थना. मनाने आणि शरिराने तो सुखरुप घऱी परत यावा यासाठीही प्रार्थना’, असं पुढे त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी गरजेच्या वेळी सर्वांनी सोबत दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळत असल्याचंही ते म्हणाले.
भारतीय पायलटची बिनशर्त त्वरित सुटका व्हायला हवी. कोणताही तह वगैरे करण्याचा प्रश्नच नाही, असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला होता. पाकिस्तानच्या विमानांनी बुधवारी भारतीय क्षेत्रात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत पाकिस्तानचं एफ-१६ जेट विमान भारताने पाडलं. या कारवाई दरम्यान भारताचं एक विमान मिग २१ पडलं आणि त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं.