Aurangabad : औरंगाबाद शहरात गुटखा विक्रीचा अवैध धंदा : विधानसभेत इम्तियाज जलील

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार इम्तियाज जलील यांनी राज्यात गुटखा विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. तरीही हा गुटखा बाजारात विक्रीला कसा येतो? असा सवाल करीत विधानसभेत गुटख्याचे पाकीट सादर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, गुटखा सह प्रतिबंधित पदार्थांची विक्री सर्रास होत आहे. याला पोलिस विभाग आणि अन्न व औषधी प्रशासन जबाबदार आहे. हप्तावसुली करून हा व्यवसाय सुरू असल्याचाही आरोप जलील यांनी केला.
औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी आमदार जलील यांनी स्वतः एका अवैध गुटखा विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन करून शहरातील बेकायदा गुटखा विक्री उघडकीस आणली होती. औरंगाबाच्या विकासासंदर्भात ते म्हणाले कि , औरंगाबाद शहर ऐतिहासिक दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या ऐतिहासिक दरवाजांची अवस्था दयनीय झाली आहे. या ऐतिहासिक दरवाजांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणीही आमदार इम्तियाज जलील यांनी केली. शासनाकडून हज यात्रेवर अनुदान देण्यात येत होते. हे अनुदान बंद करण्यात आले आहे. अनुदानावर होणाऱ्या खर्चातून औरंगाबाद शहरात कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करावे, जेणेकरून कौशल्य विकास विद्यापीठाचा भार शासनावर येणार नाही, असा प्रस्ताव आमदार जलील यांनी विधानसभेत सरकारसमोर ठेवला आहे.