दलित म्हणून ३ वेळा गेली मुख्यमंत्रिपदाची संधी आणि झालो उपमुख्यमंत्री : जी परमेश्वर

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मी दलित समाजातील असल्यामुळेच मला ३ वेळा मुख्यमंत्रिपदापासून रोखण्यात आल्याचा दावा परमेश्वर यांनी दावणगिरी येथील कार्यक्रमात केला. यावरच न थांबता ते पुढे म्हणाले की, पी के बसवलिंगप्पा आणि के एच रंगनाथ यांनाही मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. मल्लिकार्जुन खर्गे हेही मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मला स्वत: तीन वेळा मुख्यमंत्रिपद मिळू शकले नाही. कसंतरी करून मला आता उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. काही लोक राजकारणात मला दाबण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपही परमेश्वर यांनी केला. मात्र, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी परमेश्वर यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. परमेश्वर यांनी कोणत्या आधारावर असे वक्तव्य केले आहे, याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेस पक्ष दलित आणि समाजातील उपेक्षित वर्गाची काळजी घेत आहे. मला माहीत नाही की, त्यांनी कोणत्या संदर्भात असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे हे तुम्हीच त्यांना विचारा, असा सल्लाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला.
दरम्यान भाजपा नेते एम नागराज यांनी परमेश्वर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या देशातील जनतेला माहीत आहे की, काँग्रेस नेहमी नेहरू परिवाराचे समर्थक राहिली आहे. ते दलितांच्या बाजूने नाहीत. परमेश्वर यांनी ही जाणीव अत्यंत उशिरा झाली आहे. काँग्रेस दलित विरोधी आणि ओबीसी विरोधी आहे. काँग्रेस छुपा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.