Narendra Modi : किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ एक कोटी शेतकऱ्यांना लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. पंतप्रधानांनी यावेळी किसान सन्मान निधी योजनेचे महत्त्वही सांगितले. १ कोटी १ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये आज सरकारकडून जमा करण्यात आले. एकूण २ हजार २१ कोटी रुपये आजच ट्रान्सफर करण्यात आले आहेत. २१ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. माझ्या हस्ते हे शुभकाम होत असल्याने मी हा माझा मोठा सन्मान मानतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
किसान सन्मान योजनेसाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांनी शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे सोपवली आहे. तर भाजपसोडून अन्य पक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांनी या योजनेसाठी अद्याप पात्र शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे पाठवलेली नाही. यावरून पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. तुम्ही अन्नदात्या शेतकऱ्याच्या बाबतीत असे वागणार असाल तर शेतकऱ्यांच्या शापाने तुम्ही उद्ध्वस्त व्हाल, असे मोदी म्हणाले.
आता शेतकऱ्यांना २ हजार रुपये दिले जात आहोत. त्यानंतर पुढचा हप्ताही दिला जाईल. मात्र वर्षभरानंतर हे पैसे तुमच्याकडून परत घेतले जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. मोदी सरकार किंवा कोणत्याच राज्यातलं सरकार हे पैसे परत मागणार नाही. त्यामुळे जे या अफवा पसरवत आहेत, त्यांना खडसावून सत्य सांगा, असे आवाहन मोदी यांनी केले. यावेळी बोलतानासुद्धा पंतप्रधानांनी जोरदार शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे निवडणुकीसाठी एकत्र येऊन महाभेसळ करणारे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थतेतूनच योजनेबद्दल अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत, असे टीकास्त्र मोदींनी सोडले.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये कर्जमाफीची रेवडी देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. हे तुम्हाला महागात पडेल. याची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोदींनी दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी काँग्रेसच्या सरकारांनी केलेली तुटपुंजी तरतूद आणि केंद्राने केलेली भरीव तरतूद याचा तपशीलही मोदींनी यावेळी मांडला.