किसान लाँग मार्च थांबविण्यात सरकारला यश : लढा मात्र चालूच राहील

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने लेखी आश्वासन दिल्याने नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला ‘किसान लाँग मार्च’ स्थगित करण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभेचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जयकुमार रावल यांच्यात चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मोर्चाची कोंडी फुटली.
किसान सभेच्या प्रतिनिधींनी सरकारपुढे आपल्या विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत या बैठकीची तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असे महाजन यांनी नमूद केले. वन हक्क जमिनीचे दावे येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्यात येतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारच्या आश्वासनाने आंदोलकांचे समाधान झाल्याचे सांगितले. यावेळी आंदोलक प्रतिनिधीही उपस्थित होते.
किसान मोर्चाला नाशिकमध्ये रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने लाँग मार्च गुरुवारी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाला. सहा किलोमीटर मोर्चा गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केलेल्या शिष्टईला यश आले. बैठकीला जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, माजी आमदार नितीन भोसले, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मोर्चाचे प्रमुख आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, डॉ. अजित नवले उपस्थित होते.
किसान मार्च स्थगित करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेली आमची लढाई सुरूच राहणार आहे, असे आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले. वन हक्क दावे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे. या आश्वासनावर आमचा विश्वास आहे. कालबद्ध कार्यक्रमाद्वारेच आमचे प्रश्न सुटतील, अशीही अपेक्षा असल्याचे गावित यांनी नमूद केले.