खोटं बोलणं, बढाया मारणं, मोदी सरकारचं तत्वज्ञान : सोनिया गांधी

खोटं बोलणं, बढाया मारणं, विरोधकांना धमकावणं हे मोदी सरकारचं तत्वज्ञान आहे, अशा शब्दांत युपीएच्या अध्यक्षा आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. बुधवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या संयुक्त बैठकीत बोलताना त्यांनी सरकारची कार्यपद्धती, रोजगार आणि समाजाजिक सलोखा याबाबतची गेल्या पाच वर्षातील कामगिरीवरुन मोदींना ब्लफमास्टर असे संबोधत जोरदार टीका केली.
सोनिया म्हणाल्या, मोदी सरकारने २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मोदी सरकारमध्ये संसद स्वतः अस्वस्थ आणि कमकुवत बनली आहे. वादविवाद आणि चर्चा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या विविध महत्वाच्या मुद्द्यावरुन मोदींना घेरत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी, नोटाबंदीचा घोटाळा, राफेल डीलमधील भ्रष्टाचार यांमुळे मोदी सरकारची विश्वासार्हता लयाला गेली असल्याचे सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.दरम्यान, राहुल गांधी यांनी देखील या बैठकीत आपली भुमिका मांडली. काँग्रेस पक्ष भाजपाशी देशातील विविध मुद्द्यांवरुन रोजच लढा देत आहे. याव्यतिरिक्त विचारसरणीच्या स्तरावरही काँग्रेस भाजपाला लढा देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.