ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन

गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि बंडखोर कवी विष्णू सूर्या वाघ (५३) यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात निधन झाले.त्यांचे पार्थिव गुरुवारी अंत्यसंस्कारासाठी गोव्यात आणण्यात येणार आहे.
वाघ हे गेल्या अडीच वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, गेले दोन महिने विष्णू वाघ हे दोनापावला येथील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आले होते. तिथे त्यांना काहीसा आराम मिळाला होता, पण ८ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी आणि कोकणी साहित्यिक विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
विष्णू वाघ हे २०१२ साली गोवा विधानसभेचे सदस्य बनले. उपसभापतिपदी असताना २०१६मध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांचे शरीर अधू बनले होते. त्यांच्यावर दीर्घकाळ मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
साहित्य क्षेत्रासह संगीत, नाटय़, चित्र, शिल्प आदी कलांवर वाघ यांचे प्रभुत्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते. त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. साहित्यिक म्हणून सिद्धहस्त असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता. साहित्य असो वा राजकारण, त्यांनी नेहमीच अन्यायाविरोधात प्रखर लढा दिला. भंडारी ज्ञातीच्या एकत्रीकरणात त्यांचा मोठा वाटा राहिला. कला अकादमीचे ते उपाध्यक्ष होते. ‘काव्यहोत्र’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी देशभरातील कवींना गोव्यात एकत्र करून कवितेला राजाश्रय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.