अल्पवयीन मुलाच्या तस्करीचा डाव : दोघांना बेड्या
नोकरीचे आमिष दाखवून पंजाब राज्यातील एका 15 वर्षाच्या मुलाच्या मानवी तस्करीचा डाव मुंबई विमानतळावरील ब्युरो ऑफ इमिग्रेशन विभागाच्या सतर्कतेने फसला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तस्करीच्या मुख्य आरोपीसह दोघांना बेड्या ठोकल्या, या अटकेने मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.
महिपाल घासीराम हरसोलिया आणि शैलेंद्र रणधीर देशवाल उर्फ शैलेंद्र घासीराम हरसोलिया अशी गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोघा आरोपींना न्यायालयात नेले असता पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. अटक आरोपींकडून पोलिसांनी मोठ्याप्रमाणात बोगस पासपोर्टच्या झेरॉक्स प्रती हस्तगत केल्या. ब्युरो इमिग्रेशन विभागाचे कर्तव्यावरील अधिकारी व फिर्यादी सुरेंद्र पालव हे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्युटी बजावत असतानाच आरोपी महिपाल हा मेक्सिको येथे जाण्यासाठी आला होता. त्याच्याकडे पासपोर्ट आणि बोर्डिंग तसेच त्याच्याकडे फेब्रुवारी ते मे महिन्याचा असा तीन महिन्याचा व्हिसा होता. त्याने मेक्सिको मार्गे जपानला जाणार असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत शैलेंद्र आणि बिपीन हरसोलिया नावाचा 15 वर्षाचा मुलगा होता. शैलेंद्र याचे खरे नाव शैलेंद्र रणधीर देशवाल असताना त्याच्याकडे शैलेंद्र घासीराम हरसोलिया तसेच मुलाचे नाव बलराजसिंग सतनाम सिंग असताना त्याचे नाव बिपिन हरसोलिया नावाचा पासपोर्ट होता. मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने दोघांनी त्याला अमेरिकेत नोकारीचे आमिष दखविल्याचे समोर आले. मुलाच्या वडिलांनी महिपाल याला 1 लाख रुपये दिले होते. बोगस पासपोर्टद्वारे मुलाला मेक्सिको मार्गे अमेरिकेत न्यायचा डाव फसला. सदर प्रकार उघडकीस येताच स्थानिक पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात भादंवी 370 (4) 417,419, 420, 465, 467,468,471, 120(ब) आणि सह कलम 12(1), 12(2) नुसार गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली.
15 वर्षांच्या बिपिनची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. यामागे मास्टरमाइंड महिपाल होता. त्याच्या बनावट पासपोर्ट, व्हिसा, बनावट झेरॉक्स आदी दस्तऐवजाची तपासणी पोलीस करीत आहेत, आतापर्यंत किती लोकांना विदेशात पाठविण्यात आले याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.