‘महापरिवर्तना’तून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन : मुख्यमंत्री

राज्य प्रशासन आणि खासगी संस्थांनी एकत्रित येत ‘महापरिवर्तन’च्या माध्यमातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवावे. सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे, असे आवाहन करतानाच आज झालेल्या भव्य भागीदारी सोहळ्यात आरोग्य आणि जलसंधारण क्षेत्रात सुमारे 500 कोटी रुपये गुंतवणुकीचे 62 सामंजस्य करार विविध सामाजिक संस्थांसोबत करण्यात आले. त्याचा राज्यातील 50 लाख नागरिकांना लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ‘महापरिवर्तन : भागीदार विकासाचे’ हा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य, जलसंधारण या क्षेत्रातील विविध विकास कामे आणि योजनांसाठी 62 खासगी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या कामी घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य झाल्याची भावना व्यक्त करीत सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उभे राहून मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीच्या ‘क्यू आर कोड’चे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.