मायावतींना कोर्टाचे आदेश : पुतळ्यांवर खर्च केलेला पैसा परत करा

पुतळ्यांवर खर्च केलेला पैसा परत करा; मायावतींना कोर्टाचे आदेश
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्मारकं आणि पुतळे उभारण्यावर खर्च केलेले जनतेचे सर्व पैसे परत करावेत, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
मायावती यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारकडून पुतळ्यांवर करण्यात आलेल्या खर्चाला आक्षेप घेत २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सुमारे दहा वर्षांनंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढं आज त्यावर सुनावणी झाली. पुतळ्यांवर करण्यात आलेला हा खर्च न्यायालयानं प्रथमदर्शनी अयोग्य ठरवला आहे. मायावती यांना हा खर्च भरून द्यावा लागेल, असं मत खंडपीठानं व्यक्त केलं. या प्रकरणी २ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी मे नंतर व्हावी, अशी विनंती मायावतींच्या वकिलानं केली. मात्र, न्यायालयानं ती फेटाळून लावली.
उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाची सत्ता असताना मायावती यांनी राज्यातील अनेक शहरांत त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे व स्वत:चे पुतळे उभारले होते. अनेक ठिकाणच्या पार्कांमध्येही कांशीराम व मायावती यांचे पुतळे उभारण्यात आले होते. मायावतींच्या या निर्णयाचा तत्कालीन विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता.