बिटकॉइन चे लाखो ग्राहक हवालदिल


लाखोंची बिटकॉइन गुंतवणूक ‘खड्ड्यात’ जाण्याची भीती
कॅनडामधील क्वाड्रिगा-सीएक्स या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक गेराल्ड कॉटन (वय ३०) यांचे आकस्मिक निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर, या कंपनीला कॅनडामधील दिवाळखोरी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, कॉटन यांच्या निधनामुळे एक लाखाहून अधिक गुंतवणूकदार ग्राहकांचे तब्बल १४.५० कोटी डॉलर जणू ‘खड्ड्यात’ गेले असून, या एक्स्चेंजच्या खात्यांचे पासवर्ड कॉटन यांनाच माहीत असल्याने ते त्यांच्यासोबत ‘दफन’ झाले आहेत.
क्वाड्रिगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेराल्ड कॉटन यांचे ९ डिसेंबर रोजी भारतात निधन झाले. एका अनाथालयात स्वयंसेवक म्हणून काम करत असताना क्रोन्स आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाल्याचे कंपनीने १४ जानेवारी रोजी जाहीर केले होते. कॉटन यांच्या निधनामुळे १४.५० कोटी डॉलरचे बिटकॉइन्स तसेच अन्य डिजिटल संपत्तीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचे कंपनीने जाहीर केले होते.
क्वाड्रिगा कंपनीच्या वतीने कॉटन यांच्या पत्नी जेनिफर रॉबर्टसन यांनी कॅनडातील नोव्हा स्कॉटिया येथील उच्च न्यायालयात दिवाळखोरी कायद्याअंतर्गत संरक्षणासाठी अर्ज केला होता. क्वाड्रिगाजवळचे बहुतांश चलन हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड वॅलेट खात्यांमध्ये ऑफलाइन ठेवले होते. या खात्यांचे पासवर्ड फक्त कॉटन यांनाच माहीत होते. या कामासाठी पाचारण केलेल्या तज्ज्ञांना अल्प यश मिळाले. मात्र, कॉटन यांनी वापरलेला मुख्य कम्प्युटर मिळवण्यात अपयश आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.
लाखांहून अधिक ग्राहक हवालदिल
एक लाखांहून अधिक ग्राहकांचे पैसे परत करण्याचे संकट उभे ठाकले आहे. कॉटन यांच्या निधनानंतर गेले काही आठवडे या खात्यांचे पासवर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर, क्वाड्रिगाने आपल्या वेबसाइटवरील व्यवहार थांबवले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये रोष पसरला होता. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या संतापाला वाट करून देताना, गेराल्ड कॉटन यांचे खरोखर निधन झाले आहे का, याबाबत संशयही व्यक्त केला होता.