WorldNewsUpdate : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार …

नवी दिल्ली : पाकिस्तानला सध्या भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील बिघडलेल्या पूरपरिस्थितीत प्राण गमावलेल्या लोकांप्रती पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी देशातील पुरामुळे बिघडलेल्या परिस्थितीबाबत ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, पुरामुळे झालेल्या मानवी आणि भौतिक हानीबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. इंशाअल्लाह आम्ही लवकरच या आपत्तीतून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा जीवन आणि समुदायांची पुनर्बांधणी करू.
काही दिवसांपूर्वी पीएम मोदींनी पाकिस्तानमधील पुराबाबत एक ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, शेजारील देश पाकिस्तानमध्ये पूर आला आहे. पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील देशात पुरामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल दु:ख व्यक्त केले होते आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला होता. पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले होते की, “पाकिस्तानमधील पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. आम्ही पीडित, जखमी आणि या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि तेथील स्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर येण्याची इच्छा व्यक्त करतो.
I thank 🇮🇳 PM Narendra Modi @narendramodi for condolences over the human & material losses caused by floods. With their characteristic resilience the people of 🇵🇰 shall, InshaAllah, overcome the adverse effects of this natural calamity & rebuild their lives and communities.
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) August 31, 2022
नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पुरामुळे किमान 1,061 लोक मरण पावले आणि 1,575 जखमी झाले. प्राधिकरणाने म्हटले आहे की सुमारे 9,92,871 घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे ज्यामुळे लाखो लोक अन्न आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. यासह सुमारे 7.19 लाख जनावरांचाही मृत्यू झाला असून, संततधार पावसामुळे लाखो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हजारो गावे देशाच्या इतर भागापासून तुटलेली असल्याने आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्यांमुळे रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे मृतांची संख्या जास्त असू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.