Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : पुन्हा एकदा कोरोनाच्या नावाखाली राज्यातील निवडणुका लांबविण्याचे संकेत …!!

Spread the love

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून आधीच अवसान गळालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला आता पुन्हा एकदा कोरोनाचे निमित्त सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


विशेष म्हणजे या आधीही याच कारणावरून राज्य सरकारने  गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणूक पुढे ढकलल्या होत्या. दरम्यान ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यानंतर ओबीसी मतदारांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. याबाबतचा विशेष कायदा करून सरकारने निवडणूक घेण्याच्या प्रयत्नही सर्वोच्च न्यायालयाने बेदखल करीत राज्यातील महापालिकांच्या प्रलंबित निवडणूक तत्काळ घेण्याचे आदेश दिले होते. त्यावर पावसाळ्याचे कारण दाखवीत राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी असते तेथील निवडणूक लगेच घ्या आणि अतिवृष्टी होणाऱ्या भागातील निवडणुका नंतर घ्या पण निवडणूक घायचा असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा आदेशित केले होते.

ओबीसी आरक्षणावरून सरकारमध्ये चलबिचल

स्रावोच्चा न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली आहे मात्र ओबीसी आरक्षण गेल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी चिंतीत आहे. भाजपने मात्र ओबीसी उमेदवारांना त्यांच्या आरक्षणाप्रमाणे जागा देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षीय पातळीवर घेतल्याने त्यांनी त्यांच्यापुरता प्रश्न निकालात काढून निवडणुकांची तयारी सुरु केलेली आहे मात्र महाविकास आघाडीत या विषयावरून मोठी चलबिचल सुरु आहे.


सरकार या ओबीसी आरक्षणाच्या पेचात असताना , पुन्हा एकदा सरकारने कोरोनाचा हात धरून निवडणूक लांबविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत असेच दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता ,  राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर अनिश्चिततेचे  सावट आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी यावर बोलताना सांगितले की, पुढचे आठ ते १० दिवस कोरोनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यावरूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. या निवडणुकांची घोषणा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला अजून अवधी आहे. मात्र काही परिस्थिती ओढवली तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्यासाठी विनंती करावी लागेल. तसेच निवडणुका टाळता येतील का, याबाबतही चाचपणी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, शासकीय आकडेवारीनुसार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज राज्यात ११३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मुंबईमध्येही गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या वर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!