Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : महावितरण अभियंत्याला धमकावणाऱ्या माजी मंत्र्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश

Spread the love

मुंबई : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची महावितरणच्या अभियंत्याला धमकावणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार लोणीकर हे महावितरणच्याअभियंत्याला शिवीगाळ करुन धमकावत आहेत. या प्रकरणाची ऊर्जामंत्र्यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत,” असे ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या औरंगाबाद येथील बंगल्यावरील वीज थकीत वीजबिलामुळे कापली आहे . त्यामुळे संतापलेल्या लोणीकरांनी संबंधित महावितरणच्या अभियंत्याची त्याला शिवीगाळ करीत धमकी दिल्याची ध्वनिफीत पाहता पाहता व्हायरल झाली. याची माहिती मिळताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे कि , या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद आणि भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे.

राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे ३० वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे,” असा टोलाही नितीन राऊत यांनी लगावला. महावितरणच्या अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन मीटरचे वर्षभरात 10 लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी विजेचे बिल भरले नाही.

महावितरणने दिलेली माहिती

आ. बबनराव लोणीकर यांच्याशी संबंधित मीटरचा ग्राहक क्रमांक- 490014889105 असा असून हे मीटर राहूल बबनराव यादव यांच्या नावावर असून हाऊस नं. 52, गट नंबर 146, आलोक नगर, औरंगाबाद , पीन कोड- 430001 येथे हे लावलेले आहे. त्यांनी वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 18 जानेवारी 2021 असून त्यांच्याकडे या मीटरपोटी मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 3 लाख 21 हजार 470 अशी आहे. सध्या या ठिकाणची वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे.

त्यांच्याशी संबंधित दुसऱ्या मीटरचा ग्राहक क्रमांक- 490011009236 असा असून हे मीटर आय.एस. पाटील यांच्या नावावर आहे . त्याचा पत्ता- प्लॉट नं. 55, गट नं. 146, अशोकनगर जवळ, सातारा, औरंगाबाद, पिन कोड- 431001 असा असून त्यांची वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 27 मार्च 2019 अशी असून या मीटरवर मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 67 हजार 200 रूपये असून सध्या वीज बिल थकल्याने या मीटरचा वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला आहे. दरम्यान लोणीकर हे 10 लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास 4 लाख आहे असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान आ. बबनराव लोणीकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून आपण असे बोललोच नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!