Maharashtra Weather Update : काळजी घ्या : सूर्य ओकतोय आग !! जगातील दहा ‘हॉट’ शहरात भारतातील १० शहरांचा समावेश…

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून हवेच्या तापमानात मोठा बदल झाला असून मराठवाडा आणि विदर्भात सूर्याने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली आहे. या भागातील सर्वच शहरात उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अशात विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला असून मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
दरम्यान काल मंगळवारी नोंदलेल्या तापमानानुसार, चंद्रपूर हे शहर तिसऱ्या क्रमांकाचं जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. काल सकाळपासूनच चंद्रपुरात उन्हाचा चटका वाढला होता. रात्री देखील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी मालीतील कायेस शहर हे पृथ्वीतलावरील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यापाठोपाठ सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत मालीतील सेगोऊ शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. येथील तापमान 43.8 अंश इतकं नोंदलं आहे. त्यानंतर भारतातील चंद्रपूर पृथ्वीतलावरील तिसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.
जगातील दहा ‘हॉट’ शहरात भारतातील १० शहरांचा समावेश
एवढंच नव्हे तर, सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहरांचा समावेश आहे. या यादीत विदर्भातील अकोला हे शहर सातव्या क्रमांकावर असून मंगळवारी येथील तापमान 43.1 अंश सेल्सिअस एवढं नोंदलं आहे. तर भारतातील पिलानी आणि चुरू ही शहरे अनुक्रमे 43.1 अंश सेल्सिअस आणि 43.0 अंश सेल्सिअससह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.
दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने आयएमडी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वाऱ्याच्या बदलामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. नागपुरात सोमवारी हंगामातील सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारी पुन्हा हा उच्चांक ओलांडला आहे. मंगळवारी नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात उष्णतेची लाट होती. 30 आणि 31 मार्च रोजी विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.