Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MIMChiefOwesiAttackUpdate : एमआयएमचे खा. ओवेसी यांना आता झेड दर्जाची सुरक्षा, जाणून घ्या आजच्या घडामोडी …

Spread the love

नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर काल गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून त्यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दाखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. या निर्णयानुसार आता सीआरपीएफ कमांडो त्यांची २४ तास सुरक्षा करतील.एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत आपल्या भाषांच्या दरम्यान या घटनेची माहिती लोकसभेत देऊन घटनेची निंदा केली होती. अखेर खा. ओवेसी यांना केंद्राने संरक्षण दिले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्हीही आरोपींची १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


या प्रकरणाची दखल केंद्र सरकारसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने तातडीने असदुद्दीन ओवेसी यांना ‘झेड’ दर्जा सुरक्षा घोषित केली आहे. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फोन करून आपल्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. मी त्यांची भेट घेणार आहे, असे  ओवेसी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात प्रचार दौऱ्यावर असताना काल गुरुवारी संध्याकाळी पिलखुवाच्या NH-9 वर असलेल्या छिजारसी टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर दोन हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले होते मात्र ओवेसी किंवा त्यांच्यासोबत असलेल्या कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनंतर ओवैसी दुसऱ्या गाडीतून दिल्लीला रवाना झाले. संबंधित घटनेचा आता लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. टोल नाक्यावर त्यावेळी नेमकं काय घडले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघड झाले आहे.  दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आता दोन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी कारवाई करून एका हल्लेखोराला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हल्लेखोऱ्याने  गुन्हा कबूल करून हल्ल्याचे कारणही सांगितले. हे दोन्हीही आरोपी एकाच कॉलेजचे कायद्याचे पदवीधर असून दोघेही चांगले मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ?

या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार  एक लाल रंगाच्या शर्टमधील मुलगा टोल नाक्यावर ओवैसी यांच्या गाडीच्या जवळून जातो. यावेळी त्याच्या हातात काहीतरी आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी फायरिंगचा आवाज येतो. हल्लेखोर ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करतात. त्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हल्ला करणारा तरुण किती वेगात पळाला ते व्हिडिओत स्पष्टपणे जाणवत आहे. त्याला पळताना बाजूने जाणारी कारही दिसली नाही. त्यामुळे त्याचा पाय त्या कारमध्ये जातो आणि तो खाली पडतो. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाच्या शर्टातील एक तरुण समोरुन येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तो ओवैसींच्या गाडीवर थेट गोळीबार करतो. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत हल्ला करणाऱ्या त्या दुसऱ्या तरुणाचा चेहराही दिसत आहे.

आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी हजार झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात करीत दोन्हीही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. सचिन आणि शुभम अशी या दोघांची नावे  आहेत. गोळीबारात वापरण्यात आलेली हत्यारेही त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी या दोघांना आज कोर्टात हजर केल्यानंतर आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती हापूरचे पोलीस अधीक्षक दीपक भुकेर यांनी दिली.

आरोपी सचिन भाजपचा कार्यकर्ता

दरम्यान आरोपी सचिन हा दीर्घकाळापासून भाजपशी संबंधित असल्याचे  तपासातून पुढे येत आहे. ७ जुलै २०१९ ला त्याने फेसबुक पेजवर भाजपच्या ऑनलाईन सदस्यत्वाची पावतीही पोस्ट केली आहे. याशिवाय भाजप नेते अरुण सिंह, सुनील बन्सल, खासदार महेश शर्मा, आमदार श्रीचंद शर्मा, लक्ष्मीकांत वाजपेयी, नोएडाचे आमदार पंकज सिंह यांच्यासह सर्व नेत्यांचे फोटो त्याच्या फेसबुक पेजवर आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अलिकडेच नोएडामध्ये आले होते, तेव्हा सचिनही तेथे उपस्थित होता. गाझियाबादच्या एमएमएच कॉलेजमधून पदवीधर असलेला सचिन हा शाहीनबाग येथे गोळीबार करणाऱ्या गोपाल दत्त शर्माचाही  समर्थक आहे. गोपाल तुरुंगातून बाहेर आल्यावर सचिनने त्याचे नोएडामध्ये स्वागत केले होते. गोपाल हा ग्रेटर नोएडातील जेवारचा रहिवासी असून तो सोशल मीडियावर स्वतःला कट्टर हिंदू म्हणवतो.

हल्ल्याच्या आधी फेसबुकवर केली होती हि पोस्ट

प्रसार प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिनने ३ तारखेला महाराणा प्रताप, भगतसिंग, ओवेसी यांच्याशी संबंधित चार पोस्ट टाकल्या होत्या. एका पोस्टमध्ये त्याने ओवेसींच्या भाषणाचा व्हिडिओ टाकला आहे. ‘योगी कायम मुख्यमंत्री राहणार नाहीत, मोदीही कायमचे पंतप्रधान नसतील. लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या अत्याचारांना विसरणार नाही, असे ओवेसी या व्हिडिओत म्हणाले. या व्हिडिओचा संदर्भ देत आरोपी सचिनने पोस्ट केली आहे. ‘हिंदू पुत्र वाचवायला येईल’,  हि पोस्ट टाकल्याच्या काही तासानंतरच त्यांने ओवेसी यांच्या कारवर हल्ला केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!