Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra ST Strike News Update : परिवहन मंत्र्यांचा निर्णय आज घोषित होण्याची शक्यता

Spread the love

मुंबई : काल आणि आज झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मोठा निर्णय झाल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी ६ वाजता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेत असून ते या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मोठी घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत अंतरिम पगारवाढीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर आजही महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. विशेष म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीबाबतचा प्रस्ताव घेऊन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करेल असे म्हटले जात आहे.

दरम्यान राज्य सरकार पगारवाढीचा निर्णय घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना करेल असे सांगितले जात आहे. मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सरकारकडून मुंबई उच्चन्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेतला जाईल असे सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काल आणि आज झालेल्या बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नेमका काय निर्णय परिवहन मंत्री अनिल परब या पत्रकार परिषदेत सांगतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!