Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

पुणे  : महाराष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  यांचे  निधन झाले  आहे. ते १०० वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर नेते , साहित्यिक यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले  होते , तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होता.

बाबासाहेब पुरंदरे यांचा परिचय

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असे  त्यांचे  पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म जुलै १९२२ मध्ये झाला होता. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड असले तरी ते पुण्यात स्थायिक झाले होते.  भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या या कार्याबद्दल २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. तब्बल २७ वर्षांत १२५० हून जास्त प्रयोग झाले. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर ५ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रद्धांजली 

दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  ट्विटरवरून आपली श्रद्धांजली  अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी  पुरंदरे यांच्या  भेटीचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि , शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी शब्दांच्या पलीकडे दुखत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील.

याशिवाय मोदींनी  या ट्विट सोबत आणखी एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं की, पुरंदरे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या कार्यातून ते जीवंत असतील. बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचेही  मोदींनी म्हटले  आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर  तीव्र शोक व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले, अशा शब्दात त्यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!