Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : जहाजावरील पार्टीबाबत एनसीबीची चौकशी चालू , आर्यनसह ८ जणांना घेतले ताब्यात

Spread the love

मुंबई : मुंबईच्या समुद्रात एका जहाजावर छापा टाकीत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी मोठी कारवाई करून या जहाजावर चालू असलेल्या एका रेव्ह पार्टीमध्ये ८ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे.

दरम्यान एनसीबीच्या या सात तासांच्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली असून त्यात एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. मात्र, तपास अद्याप सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी प्रवासी क्रूझवर छापा टाकण्यात आला, जिथे पार्टी चालू होती आणि त्यात ड्रग्जचे सेवन केले जात होते. हे जहाज गोव्याला जाणार होते आणि त्यावर शेकडो प्रवासी होते. जहाजावर पार्टी असल्याची माहिती मिळताच एनसीबीच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईबाबत माहिती देताना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन करणाऱ्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. दरम्यान एनसीबीने आर्यन खानचा फोन एनसीबीने जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या इतरांचे मोबाईल फोनही चौकशीसाठी जप्त करण्यात आले असून त्यावरील सर्व तपशील देखील तपासले जात आहेत. या प्रकरणात बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह १० लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.

आर्यनचे म्हणणे असे आहे

आर्यन खानच्या जबाबानुसार त्याला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आले  होते. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांनी  आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिले  असा दावा केला आहे.  प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती. दरम्यान एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओंमध्ये आर्यन खान सफेद टी-शर्ट, लाल शर्ट, निळी जीन्स आणि टोपीत दिसत आहे.

एनसीबीकडून  ज्यांची चौकशी चालू आहे त्यामध्ये १) मुनमून धमेचा , २) नुपूर सारिका , ३) इस्मीत सिंग, ४) मोहक जसवाल, ५) विक्रम छोकेर, ६) गोमित चोप्रा, ७) आर्यन खान , ८) अरबाज मर्चंट आदींचा समावेश आहे. दरम्यान  एफटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशीफ खानदेखील एनसीबीच्या रडारवर असून त्यांनीच  ही पार्टी आयोजित केली असावी अशी एनसीबीची माहिती आहे. दरम्यान एनसीबीचे प्रमुख एस एन प्रधान यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवडे सुरु असलेल्या तपासाचा हा निकाल आहे. आम्हाला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली असताना बॉलिवूड लिंक समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!