Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : बचाव कार्यात अडथळे आणाल तर सडेतोड उत्तर , जो बायडेन यांचा तालिबान्यांना गंभीर इशारा

Spread the love

वॉशिंग्टन : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून या देशात अडकलेल्या विदेशी नागरिकांना त्या त्या देशातील सरकार एअर लिफ्ट करून नेत आहेत. दरम्यान या मदतकार्यात तालिबान्यांकडून कोणताही अडथळा निर्माण केला केला जाऊ नये म्हणून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे.

 

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये बायडेन यांनी तालिबान्यांना कठोर इशारा दिला आहे. “आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेले बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला तितक्याच तीव्रतेने आणि सडेतोड उत्तर दिले जाईल”.

दहशतवादविरोधातील लढा कायम राहणार

दरम्यान, अफगाणिस्तानमधून अमेरिकी आणि नाटोच्या फौजा जरी माघारी आल्या असल्या, तरी अमेरिकेचा दहशतवादविरोधातील लढा कायम राहणार असल्याचं यावेळी बायडेन यांनी स्पष्ट केलं. यासाठी आमचे सहकारी आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच देशांसोबत आम्ही मिळून काम करू, असं बायडेन यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जो बायडेन यांनी काबूल विमानतळावरील दृष्य वेदनादायी होती, असे म्हटले आहे. “गेला आठवडा मन हेलावून टाकणारा होता. काबूलमध्ये हवालदील झालेल्या नागरिकांची देशाबाहेर पडण्यासाठी आटापिटा करणारी दृश्य काळीज पिळवटून टाकणारी होती. ते घाबरले आहेत, दु:खी आहेत. त्यांना कळत नाही की, यानंतर आता पुढे काय होणार आहे”, अशा शब्दांत जो बायडेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानमधून फौजा माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावरून होत असलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. “एकदा ही मोहीम संपली, की टीका करण्यासाठी आणि दुसरी मतं ऐकून घेण्यासाठी भरपूर वेळ असेल. पण आत्ता माझं पूर्ण लक्ष हे काम (अफगाणिस्तानमधून अमेरिकी नागरिकांना सुखरूप परत आणणे पूर्ण करून घेण्यावर केंद्रीत आहे”, असेही ते म्हणाले.

तालिबान्यांची भाषेची अडचण

अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि अफगाणी नागरिकांना हलवण्यात अमेरिकेला अडचणी येत असून सशस्त्र तालिबान्यांनी ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकेला सैन्य माघारी न्यायचे असून युद्धग्रस्त देशातून अजून हजारो लोकांना हलवण्याचे काम बाकी आहे.तालिबानी योद्ध्यांनी विमानतळाभोवती तपासणी नाके सुरू केल्याने भीतीचे वातावरण आहे. अनेक अफगाणी लोकांकडे कागदपत्रे नाहीत त्यामुळे ते विमानतळावर अडकून पडले आहेत. अनेक तालिबानी योद्धयांना कागदपत्रांवर काय लिहिले आहे हे वाचताही येत नाही त्यामुळेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऑगस्टनंतरही काहींना रहावे लागू शकते, पण तरी त्यांना परत मायदेशी नेण्यात येईल यात शंका नाही. बायडेन ३१ ऑगस्टची मुदत वाढवून देणार की नाही हे समजू शकलेले नाही.

काही तासात लष्करी उड्डाणे सुरू होतील

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले, की किमान सहा हजार लोकांना आतापर्यंत हलवण्यात आले असून गुरुवारपर्यंत तरी मोहीम प्रगतिपथावर होती. येत्या काही तासांत लष्करी उड्डाणे सुरू होणार आहेत. त्यानंतर माघारीच्या प्रक्रियेला वेग येईल.गेल्या दोन दिवसात दोन हजार लोकांना अमेरिकेत नेण्यात आले असल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करी विमाने एका दिवसात ५ ते ९ हजार लोकांना मायदेशी नेऊ शकतात. परराष्ट्र खात्याचे लोक कागदपत्रांची तपासणी वेगाने करीत आहेत. विमानतळाची प्रवेशद्वारे उघडण्यात आली आहेत. असे असले तरी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व अमेरिकी लोकांना माघारी नेणे अमेरिकेला अवघड आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!