एमजे अकबर यांच्या मानहानीचा खटला कोर्टने फेटाळून लावला

एमजे अकबर मानहानी केस प्रकरणात रॉउज एवेव्यू कोर्टने मोठा निर्णय दिला आहे. महिला पत्रकारावरील आरोप सिद्ध झाले नसल्याचे सांगत कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर यांच्या मानहानीचा खटला फेटाळून लावला आहे.
MJ Akbar defamation case against journalist Priya Ramani: Woman has right to put her grievance even after decades, says Delhi Court
— ANI (@ANI) February 17, 2021
अकबर यांच्या वागणुकीच्या भितीमुळे प्रिया रमाणी आणि गजाला वहाब यांनी कामाच्या ठिकाणी छळवणूकीविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पीडितेला कित्येक वर्ष तिच्यासोबत काय होत आहे, हे माहित नव्हते. महिलेला आपल्या सोबत झालेल्या गुन्ह्याबाबत कधीही आणि कुठेही बोलण्याचा, आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. घडलेल्या घटनेच्या दशकानंतरही महिला तिच्यावरील गुन्ह्याविषयी आवाज उठवू शकते, असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल महिलांना शिक्षा होऊ शकत नाही, असेही कोर्टाने या प्रकरणात बोलताना सांगितले.
लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्या या आरोपांनंतर एम.जे. अकबर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. आपल्याविरूद्धचे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा खुलासा अकबर यांनी केला होता. त्यावर कोर्टाने मोठा निर्णय देत त्यांचा हा अब्रुनुकसानीचा दावा फेटाळला आहे.
अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. अकबर हे ‘द टेलिग्राफ’, ‘एशियन एज’ आणि ‘द संडे गार्डियन’ या वृत्तपत्रांचे संपादक होते. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणे, मद्य पिण्यासाठी आग्रह करणे, आक्षेपार्ह शेरेबाजी करणे असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले होते.