Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही , मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Spread the love

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दूर झाली आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘काँग्रेस अजिबात नाराज नाही. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली’ असा दावा थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला.

मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीला सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत व अनिल देसाई उपस्थित होती. सुमारे तासभर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाल्याचे सांगण्यात आले. ‘काँग्रेसला मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती, या चर्चांना काहीही अर्थ नाही. आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात दु:खद घटना घडली होती. त्यामुळे मध्ये दोन दिवस गेले. बाकी दुसरं कोणतंही कारण नव्हतं’, असं थोरात यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांसोबत आज सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेने आम्ही समाधानी आहोत. आमचं म्हणणं आम्ही मुख्यमंत्र्यांपुढे मांडलं आहे. सरकारमध्ये समानता असावी इतकीच आमची अपेक्षा होती आणि आमच्या म्हणण्याला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद होता, असे थोरात यांनी नमूद केले. काँग्रेसला कोणत्याही बैठकीत डावललं गेलं नाही. प्रत्येक बैठकीत व निर्णय प्रक्रियेत आम्ही होतो पण आमच्या काही कल्पना प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची गरज होती. त्यासाठीच आजची बैठक होती, असेही थोरात यांनी पुढे सांगितले. आजच्या बैठकीतील विषय प्रामुख्याने प्रशासकीय होते. विविध विभांगाबाबत चर्चा होती. विशेषत: करोनामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस संकटात सापडला आहे. गेले अडीच महिने तो घरी आहे. या सर्वांसाठी सरकारने काहीतरी ठोस मदत करायला हवी. ही मदत रोख स्वरूपात असावी, अशी आमची अपेक्षा बोलून दाखवल्याचेही थोरात म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी ही जनतेसाठी बनली आहे. आजवर नेहमीच सरकारने जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं आहे. यापुढेही सरकारच्या अजेंड्यावर अग्रस्थानी जनताच राहील. या सर्वात काँग्रेस सरकारसोबत असेल, असेही थोरात म्हणाले. कोकणवर वादळाचं संकट कोसळलं आहे. त्या भागाचा मी दौरा केला. तेथील स्थितीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तिथे छोट्या छोट्या बागा आहेत. त्या उद्ध्वस्त झाल्यात. त्यांना हेक्टरी गणित न लावता गुंठ्यांनुसार मदत करायला हवी, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचेही थोरात यांनी नमूद केले. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्याबाबत विचारचं असता यावर बोलून झालंय. आता पुन्हा तो विषय नको, असे थोरात म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!