Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusControversy : चर्चेतली बातमी : अमेरिकेला उद्धवस्त करण्यासाठी चीनने तयार केला हा व्हायरस ? WHO चा निधी रोखण्यावरून अमेरिकेवर टीका….

Spread the love

जगभर कोरोना व्हायरसची चर्चा चालू असतानाच चीनमधून सुरू झालेल्या करोनाच्या संसर्गावर वेगवेगळे दावे होत असताना अमेरिकेने,  चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेतच  करोनाच्या विषाणूची निर्मिती झाली असल्याचा दावा  केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील वृत्तवाहिनी फॉक्स न्यूजने हा दावा केला आहे. एका खास उद्देशाने हा व्हायरस तयार करण्यात आला असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने ‘फॉक्स न्यूज’ने दिले आहे. करोनाच्या माध्यमातून अमेरिकेला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. ‘फॉक्स न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने वुहान लॅबमध्ये करोना व्हायरसची निर्मिती एक जैविक शस्त्र नव्हे तर संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवण्यासाठी केली असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेप्रमाणे किंवा त्यांच्याहून अधिक चांगल्याप्रकारे आपण घातक व्हायरसचा मुकाबला करू शकतो हे दाखवण्यासाठीच चीनने करोनाची निर्मिती केली असल्याचा दावा फॉक्स न्यूजच्या सूत्रांनी केला आहे.


या वृत्तात ‘फॉक्स न्यूज’ने म्हटले आहे कि , चीनचे हे आतापर्यंतचे सर्वात गुप्त आणि अतिशय खर्चिक प्रकल्प असण्याची शक्यता आहे. करोनाच्या व्हायरसने वटवाघळांमधून माणसांमध्ये प्रवेश केला. करोनाचा ‘पेशंट झिरो’ देखील वुहानच्या प्रयोगशाळेत काम करत होता. हा पेशंट झिरो वुहानच्या बाजारपेठेत गेल्यानंतर करोनाचा संसर्ग सगळीकडे फैलावला असल्याची माहिती सूत्रांनी फॉक्स न्यूजला दिली. चीनने याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. चीनला या व्हायरसच्या माध्यमातून इटली आणि अमेरिकेला जेरीस आणायचे होते, असा धक्कादायक आरोपही या वृत्तात करण्यात आला आहे.

WHO चा निधी रोखण्यावरून अमेरिकेवर टीका….

विशेष म्हणजे करोनाच्या संसर्गाबाबत चीनवर याआधीदेखील आरोप झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील करोनाच्या संसर्गाच्या मुद्यावर चीनवर अनेकदा निशाणा साधला आहे. करोनाच्या संसर्गाबाबत आपण चौकशी करणार असल्याचेही त्यांनी याआधी जाहीर केले होते. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात चीन व जर्मनीने सूर आवळला असून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तर, संयुक्त राष्ट्र संघानेही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे करोनाशी लढाई सुरू असताना जागतिक राजकारणात घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये सर्वांत आधी उद्रेक झालेल्या करोना विषाणूंच्या फैलावाविषयीची माहिती दडवल्याचा आरोप करत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) ५० कोटी डॉलरचा निधी रोखला आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यांचे मूलभूत कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही ट्रम्प यांनी ठेवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मुख्य आक्षेप काय ? 

डिसेंबरमध्ये चीनच्या हुबेई प्रांतातून कोरोनाचा उद्रेक झाला होता . सुरुवातीला चीनच्या वुहान शहर व परिसरातून सुरु झालेल्या या आजाराने आता जगभर थैमान घातले असून, आतापर्यंत एक लाख १९ हजारांपेक्षा जास्त जणांचा यात मृत्यू झाला आहे. यामध्ये अमेरिकेतील २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेताना, या संघटनेने चीनच्या बाजूने विचार केला आहे आणि त्याचा परिणाम होऊन अमेरिकेची अर्थव्यवस्था थांबली आहे, अशी टीका ट्रम्प आणि त्यांच्या मंत्र्यांनी केली होती. हा निधी रोखताना ट्रम्प म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याच्या सूचना मी माझ्या प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच, करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यातील या संघटनेचे गैरव्यवस्थापन आणि हा आजार दडवण्यामागील भूमिका यांचे मूल्यमापनही करण्यात आले. तेथे काय झाले, हे सर्वांना माहीतच आहे.’ अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला दरवर्षी ४० ते ५० कोटी डॉलरचा निधी देण्यात येतो. तर चीनकडून चार कोटी डॉलर देण्यात येतात, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले.

म्हणून जागतिक आरोग्य संघटनेवर ट्रम्प यांनी तोफ डागली….

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतानुसार , जागतिक संघटनेने जबाबदार असावे, हे पाहणे या संघटनेचा सर्वाधिक निधी देणारा देश म्हणून अमेरिकेचे कर्तव्य आहे. चीन व अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांना रोखू न देणे, हा या संघटनेचा निर्णय सर्वांत धोकादायक आणि महागात पडला. मी हा निर्णय मानला नाही. त्यामुळे, हजारो जणांचा मृत्यू झाला असता. वुहानमधील सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळत होती आणि त्यातून चीन सरकारचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट होत होते. हा आजार रुग्णांकडूनच पसरत असल्याचे डिसेंबरमध्येच स्पष्ट झाले होते. मात्र, त्याची चौकशी करण्यात ‘डब्ल्यूएचओ’ला अपयश आले. आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात ‘डब्ल्यूएचओ’ने विलंब केला. त्यामुळे, महत्त्वपूर्ण वेळ वाया गेला. विषाणूंचे योग्य नमुने संकलित करण्यामध्येही ‘डब्ल्यूएचओ’ला अपयश आले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना या विषाणूंवर संशोधन करण्यात अडचणी येत आहेत. चीन पारदर्शक असल्याची स्तुती करण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांना तेथे जाण्याची वेळीच परवानगी मिळाली असती, तर हा प्रसार रोखणे आणि बळींची संख्या आटोक्यात ठेवणे शक्य झाले असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आरोपात पुढे म्हटले कि , ‘डब्ल्यूएचओ’ कोरोना विषाणूंविषयी चीनच्या खोट्या माहितीवरच अवलंबून राहिली. हा संसर्गजन्य आजार नाही आणि प्रवासावर बंदी घालण्याची गरज नसल्याचे सातत्याने सांगण्यात आले. त्यांच्या या भूमिकेमुळेच, हा आजार वीस पट किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात पसरला आहे.

निधी वाढविण्याचे चीनचे संकेत, जर्मनीचीही अमेरिकेवर टीका 

दरम्यान सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य कोणत्याही मानवतावादी संघटनेचा निधी कमी करण्याची ही वेळ नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ऐक्य दाखविणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करण्याची ही वेळ असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेर्रस यांनी म्हटले. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर चीनने चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी या संघटनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे संकेतही दिले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयावर चीन गंभीर चिंता व्यक्त करत आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे. ‘करोनाच्या लढ्यामध्ये चीनने दोन कोटी डॉलरचा निधी दिला असून, सध्याच्या परिस्थितीचा विचार करत आहोत,’ असे सांगत त्यांनी निधी वाढविण्याचे संकेत दिले. याशिवाय निधी रोखण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर जर्मनीनेही टीका केली आहे. ‘इतरांवर आरोप केल्याने काहीही फायदा होणार नाही. चाचण्या व लसींचा विकास व प्रसार यांसाठी संयुक्त राष्ट्रे, निधीची कमतरता असणारी डब्ल्यूएचओसारखी संघटना यांना मजबूत करणे, हीच सर्वोत्तम गुंतवणूक असेल,’ अशी प्रतिक्रिया जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हिको मास यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!