Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या तपासाबाबत एनआयए ची टीम पुण्यात दाखल, राज्य सरकारच्या सहकार्याची प्रतीक्षा…

Spread the love

बहुचर्चित भीमा कोरेगाव एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगलीच्या तपास प्रकरणाविषयीची  कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी एनआयए राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी , एनआयएटीम आज दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या प्रकरणातील मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान आज या तपासाची कागदपत्र हाती घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसली आहे. परंतु, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परवानगी येत नाही तोवर तपासाची कागदपत्र देता येणार नाहीत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. एनआयएने पोलीस महासंचालकांकडे तपासाची कागदपत्र देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पुणे पोलिसांना कुठलेही आदेश आलेले नाहीत, त्यामुळे एनआयएकडे तपास सोपवण्याची प्रक्रिया थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्र गृहमंत्रालयाला कळवणार आहे. महाराष्ट्र राज्य अतिरिक्त सचिव गृह हे पोलीस महासंचालक कार्यालयाला आदेश देणार त्यानंतर पोलीस महासंचालक हे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश देतील. जर ही प्रक्रिया झाली नाही तर एनआयए कोर्टाच्या आदेशानुसार वॉरंट घेऊन पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर अधिकारी हजर राहतील आणि आरोपी आणि गुन्हा वर्ग करायचे परवानगी मागतील. न्यायालयाच्या आदेशानुसार, गुन्हा आणि आरोपी वर्ग केले जातील. या प्रकरणात आरोपीचे वकील आक्षेप घेऊ शकतात त्यांवर ही सुनावणी होऊन निर्णय होऊ शकतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!