Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपच्या टीकेला नवनिर्वाचित मंत्री अस्लम शेख यांनी दिले ” हे ” उत्तर

Spread the love

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला खुद्द अस्लम शेख यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपचा जन्म या देशाचा सत्यानाश करण्यासाठी झाला आहे. महात्मा गांधी यांना मारणारे आणि नथुराम गोडसेचं मंदिर बांधणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?, आम्ही त्यांना योग्य उत्तर देत राहू,’ असा घणाघात शेख यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांचाही समावेश आहे. अस्लम शेख यांनी २०१५ साली याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी अधिवेशनात केली होती. तसंच, फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर त्यांनी स्वाक्षरी देखील केली होती. तोच मुद्दा लावून धरत भाजपने  अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा निषेध केला होता. तसेच, सरकारवर टीका केली होती.

दरम्यान   काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. अस्लम शेख हेही त्यांच्यासोबत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजपकडून होणाऱ्या आरोपांबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी भाजपच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. ‘भाजप सरकार देशात सत्तेवर आल्यापासून सातत्यानं फक्त भ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फाशीची शिक्षा रद्द व्हावी या याचिकेवर मी स्वाक्षरी केली होती. कुठल्याही आरोपीच्या समर्थनासाठी मी सही केली नव्हती. विशेष म्हणजे, त्या याचिकेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्तींच्याही सह्या होत्या. इतकंच काय, भाजपचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचीही सही होती. तेव्हा भाजपवाले झोपले होते का?, भाजपनं आधी शत्रुघ्न सिन्हांना जाऊन हे प्रश्न विचारावेत,’ असंही शेख यांनी ठणकावून सांगितले.

‘महात्मा गांधी यांची हत्या करणारे हे लोक आहेत. आता ते नथुराम गोडसेचं मंदिर बांधत आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? विरोधात असल्यानं ते कुठलाही मुद्दा उकरून काढत आहेत. आम्ही त्यांना जरूर उत्तर देऊ,’ असं शेख म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!