Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सत्तास्थापनेबाबत काँग्रेसचा निर्णय अजूनही न झाल्याने राष्ट्रवादी अडचणीत?

Spread the love

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून होणारे मतभेद उघड झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेससोबत कुठलीही बैठक नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही,  असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारा यांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचे खापर फोडले आहे. यामुळे सत्तास्थापनेचा पेच आणखीनच वाढला आहे. दरम्यान, सत्तास्थापनेवर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोअर कमिटीची बैठक होतेय. तर काँग्रेसची दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची चर्चा करून महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रावादीच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि सत्तास्थापनेवर मार्ग निघेल, अशी चर्चा आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेससोबतच्या बैठकीबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. आज काँग्रेसची कुठलीही बैठक होणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसचा कुठलाही निर्णय न झाल्याने अखेर राज्यपालांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. परंतु सत्तास्थापनेबाबत अजूनही काँग्रेसचा निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अडचणीत वाढ झाली आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सत्तास्थापनेबाबत आमचा निर्णय झाला आहे. आम्ही काल दिवसभर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. पण काँग्रेसने कुठलाही निर्णय घेतला नाही. यावर आमची काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही एकटे निर्णय घेऊ शकत नाही, असे अजित पवार यांनी आज पुन्हा स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. लीलावती रुग्णालयात जाऊन पवारांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राऊत यांना छातीत दुखू लागल्याने काल लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!