Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभूतपूर्व नुकसान , पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज माफी द्यावी : शरद पवार

Spread the love

‘राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती व दुग्धव्यवसायाचे झालेले नुकसान लक्षात घेता, या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांनी गुरुवारी पुण्यात केली. पूरग्रस्तांना मदत करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. शिरूरमध्ये २० प्रकारच्या भाज्या येतात. पुरामुळे त्याचं नुकसान झालं आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात फळं, शेती, पीकं, रस्ते, दुकानं, पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. शेत जमीनीची मातीही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांनी पुरामुळे सोडून दिलेलं पशूधनही वाहून गेली आहेत. या भागातून होणाऱ्या दूध पुरवठ्याची ३५ ते ४० टक्के आवक घटली असून पुराचा दुग्ध व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. चोहोबाजूने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. पूर ओसरल्यानंतर या नुकसानीचा खरा अंदाज येईल, असं सांगतानाच पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. तसेच पूर ओसरल्याबरोबर पंचनामे करून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मी अनेक पूर पाहिले. पूरग्रस्त भागांना भेटीही दिल्या. पण जिल्ह्याजिल्ह्यात आलेला असा पूर कधीच पाहिला नाही. यावेळच्या पुराची व्याप्ती प्रचंड मोठी असून त्यामुळे तिन्ही जिल्ह्याचं अभूतपूर्व नुकसान झालं आहे, असं पवार म्हणाले. दरम्यान, दंगल, पूरपरिस्थिती आणि आणीबाणीच्या काळात शासकीय यंत्रणा तत्परतेने कामाला लागतात. नैसर्गिक संकट आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किती गांभीर्याने पाहतात, त्यानुसार, सरकारी यंत्रणा अशा संकटकाळी वेगाने हलते. मात्र, त्यावर राजकीय मतभेद, टीका-टिप्पणी न करता पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, याचा प्रयत्न राजकीय पक्ष, सार्वजनिक व सेवाभावी संस्थानी करावा. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित शिव स्वराज यात्रा स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. आमचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. ५० लाखांचा धनादेश आम्ही देणार आहोत, असं पवार म्हणाले. तसेच भारतातील औषध निर्मितीच्या संघटनेचे प्रमुख जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते औषध कंपन्यांशी संपर्क साधून पूरग्रस्तांना लागणाऱ्या औषधांचा पूरवठा करणार आहेत. आंबेजोगाईतील राष्ट्रवादीचे डॉ. काळे हे डॉक्टरांचं पथक पूरग्रस्त भागात पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!