सिद्धिविनायककडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाख

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून पुलावामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले. या घटनेमुळे सगळा देश हळहळला. आजच शहीद जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला त्याआधी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदाही दिला. आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत जाहीर केली.
ही घटना घडल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त होतो आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टप्रमाणेच पुण्यातील मेरी टेक्निकल इन्स्टिट्युटच्या माध्यमातूनही २५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.