डॉ. पायल आत्महत्या : वैद्यकीय महाविद्यालयाकडून महिला आयोगाला अहवाल सादर , डॉ . पायल किंवा तिच्या नातेवाईकांनी लेखी तक्रार केल्याचा इन्कार

राज्य महिला आयोगाने नायर वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयाकडे डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात कोणते निर्देश दिले व काय कारवाई केली, याचा अहवाल मागितला होता. तो दोन दिवसांपूर्वी आयोगाला सादर करण्यात आला. पोलिस, महापालिका तसेच राज्य सरकारने नेमलेल्या समितीपुढे रुग्णालयाने जे म्हणणे मांडले, तेच अहवालात स्पष्टीकरणादाखल नमूद करण्यात आले असल्याचे मटा ऑनलाइनवर देण्यात आले आहे.
कुलगुरूंच्या आदेशानुसार जे.जे. वैद्यकीय कॉलेज व रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमध्ये विविध वैद्यकीय कॉलेजांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या पोलिस चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध पुन्हा स्वतंत्रपणे प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. डॉ. पायलच्या आईने डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा व डॉ. भक्ती मेहर यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली असल्याने त्यांना २७ मेपासून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. पायल किंवा तिच्या नातेवाईकांनी नायर रुग्णालयाच्या कार्यालयात कोणतीही लेखी तक्रार दिल्याचा वा अधिष्ठातांना भेटल्याचा या अहवालात इन्कार करण्यात आला असून, २३ मे रोजी डॉ. चिंग लिंग, डॉ. स्नेहा शिरोडकर यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे यात नमूद केले आहे.
वास्तविक डॉ . पायलच्या आईने महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता असे म्हटले होते परंतु व्यवस्थापन त्याचा इन्कार करीत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निर्देशानुसार, नायर रुग्णालयात रॅगिंगविरोधी समिती वेळोवेळी विविध विभागांत अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांना त्रास होतो का, याची पाहणी करत असते. यासंदर्भात बैठकाही आयोजित करण्यात येतात. विद्यार्थी, वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्णालयातील इतर संबंधितांना याप्रकरणी त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली व हा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठवण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. यासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी अहवालाचा अभ्यास करून पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यात येईल, असे ‘मटा’ला सांगितले.
डॉ. पायल तडवी प्रकरणातील तीन आरोपींची रविवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. कडक पोलिस बंदोबस्तात त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ही डीएनए चाचणी असल्याचे जे.जे.तील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांकडून खात्रिलायकरीत्या समजते.