ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांची एक्झिट

अंतर्मुख करणारं लेखन, संवेदनशील दिग्दर्शन व कसदार अभिनयामुळं भारतीय साहित्य व सांस्कृतिक वर्तुळावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड आजारपणाशी झुंज देत होते. बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी बंगळुरुतील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.