इंग्रजीत नापास होण्याच्या भीतीने त्याने केली आत्महत्या आणि झाला क्लियर पास !!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकालआज जाहीर झाला. इंग्रजी विषयात नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या करणारा प्रणव जरग ४२% टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला आहे. प्रणव उत्तीर्ण झाल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने कुटुंबीयांना दिली. नापास होण्याच्या भीतीने प्रणव सुनील जरग (वय १६, रा. आर. के. नगर सोसायटी, नंबर ५) या विद्यार्थाने गळफास लावून गुरुवारी (ता. ६ ) आत्महत्या केली होती. आज दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यावर त्याला दहावीत ४२ टक्के गुण मिळाल्याचे समजले. अवघड वाटत असलेल्या इंग्रजी विषयात ३७ गुण मिळाले आहेत. प्रणव उत्तीर्ण झाल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने दिली.
गुरुवारी सायंकाळी मुलांसोबत खेळून आलेल्या प्रणवने आईबाबांसोबत बाहेर जाण्यास नकार देऊन घरीच राहणे पसंत केले. घरातील दिवे मालवून त्याने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे काका बाजीराव घरी परतल्यावर या गोष्टीचा उलगडा झाला.
आत्महत्या करण्यापूर्वी मी इंग्रजी नापास होणार असल्याची भीती त्याने घरी बोलून दाखविली होती. मात्र पालकांनी ‘कितीही गुण मिळूदेत, काळजी करु नको’, असे सांगितले होते. प्रणवने आत्महत्या केल्याने तो दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, मात्र आयुष्याच्या परिक्षेत नापास झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.