10 रुपयात साड्यांचा महासेल, चेंगराचेंगरी होण्याच्या शक्यतेमुळे सेल केला बंद !!

उल्हासनगरमधील रंग क्रिएशन दुकानात ५ जूनपासून हा महासेल सुरु करण्यात आला होता. या महा सेलची चर्चा केवळ मुंबईतच नव्हे तर सोशल मीडियामुळे सर्वत्र झाली होती . या सेलमध्ये केवळ १० रुपयांना ग्राहकांना साडी मिळत होती . या सेलची माहिती मिळताच मुंबई, ठाणे, उल्हासनगर याठिकाणच्या महिलांनी साडी खरेदी करण्यास एकच गर्दी केली.
महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावलेल्या या सेलला सुरुवात झाल्यापासून येथे अनेक महिलांनी गर्दी केली. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांची गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळे काही काळ या ठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
दरम्यान तीन दिवसांनंतर आज ८ जून अखेर दुकान मालकांनी हा सेल बंद केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणाने दुकान मालकांनी दुकान बंद करण्याच निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा सेल बंद झाल्यानंतरही या ठिकाणी महिला गर्दी करीत आहेत.