केरळ दौऱ्यात गुरुवायूर मध्ये मोदींची कमळ तुला, एकही जागा मिळालेली नसताना केरळात येण्याचे मोदींनी सांगितले हे कारण !

पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्या दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. केरळमधील त्रिसुर इथे मोदी दाखल झाले. इथल्या प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर इथे मोदींची तुला झाली. एका तराजूत कमळाची फुलं, फळं आणि धान्य ठेवून मोदींची तुला करण्यात आली. ज्या वस्तूंची तुला केली जाते, त्या वस्तू दान केल्या जातात. यापूर्वी २००८ मध्येही ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना कमळ तुला झाली होती.
दरम्यान, मोदींच्या तुलेसाठी जी कमळाची फुलं वापरण्यात आली, ती केरळमधील मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवली होती. थिरुनवाया गावातील मुस्लिम शेतकऱ्यांनी पिकवलेली ही फुलं मोदींच्या तुलेसाठी वापरण्यात आली. मोदींच्या तुलेसाठी ११२ किलो कमळ मागवण्यात आली होती. मल्लापूरम इथल्या शेतात मान्सून अभावी आलेल्या अडचणींमुळे काही फुलं तामिळनाडूतूनही मागवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यापूर्वी केरळच्या प्रसिद्ध गुरूवायूर मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी प्रार्थनाही केली. याठिकाणी त्यांची ११२ किलो कमळांची तुला (तुलाभारम) करण्यात आली. त्रिशूरमध्ये त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित केले.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘गुरूवायूरला येण्याचे भाग्य मला लाभले आहे. हे प्रेरणास्थान आहे. मी भाजपा कार्यकर्ते आणि केरळच्या जनतेला धन्यवाद देतो की त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदविला. जनता जनार्दन परमेश्वराचे रूप असते हे या निवडणुकांच्या वेळी भारतीयांनी पाहिले आहे. राजकीय पक्षांना जनतेच्या कलाचा अंदाज आला नाही, पण जनतेने भाजपा आणि एनडीएच्या खात्यात भरभरून मते टाकली. त्यामुळे मी जनतेपुढे विनम्रपणे माथा टेकवितो. अनेक लोक हैराण आहेत की एकही जागा जिंकलेली नसताना मोदी केरळमध्ये का आले? पण निवडून आल्यानंतर देशाच्या १३० कोटी जनतेची विशेष जबाबदारी असते. म्हणून ज्यांनी आम्हाला विजयी केले, तेही आमचे आहेत आणि ज्यांनी यंदा ज्यांनी आम्हाला निवडून दिले नाही, तेही आमचे आहेत. निपाह व्हायरसचे रूग्ण सध्या केरळमध्ये सापडत आहेत. याबद्दल पंतप्रधान म्हणाले की निपाह व्हायरसशी लढा देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत आहोत. भारत सरकार तुमच्यासोबत आहे.