पोहायला म्हणून टँकरचालक असलेल्या वडिलांसोबत गेले आणि शेततळ्यात बुडून मरण पावले

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे काळू धरण परिसरातील शेततळ्यात पोहण्यास उतरलेल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ढवळपुरी येथील नूरमहमंद बशीर शेख हे खाजगी पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून काम करतात. ते काळू धरण परिसरातील खाजगी शेत तळ्यावरून टँकर भरून परिसरातील जनावरांच्या छावण्यांना वितरित करत होते. गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान नूरमहमंद, यांच्याबरोबर त्यांचा मुलगा नावेद, ईस्लाइम शब्बीर शेख व मोईन निजाम शेख हे टँकरबरोबर गेले. टँकर भरत असताना हे तिघेही शेत तळ्यात पोहण्यासाठी उतरले.
पाण्याचा अंदाज न आल्याने व शेततळ्यात कोणताही आधार न मिळाल्याने हे तिघे बुडू लागले. ही घटना नूरमहमंद यांच्या लक्षात आल्याने तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी गावात फोन करून घटनेची माहिती दिली. गावातून ग्रामस्थ व युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना बाहेर काढले. त्यानंतर ढवळपुरी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यास सांगितले. मात्र, नगर येथे नेत असतानाच रस्त्यात त्यांचे दुर्देवी निधन झाले. यातील ईस्माइल हा तृतीय वर्ष शास्त्र शाखेत व नावेद दहावीत आश्रमशाळेत शिकत होता, तर मोईन हा दुर्गादेवी विद्यालयात आठवीत शिकत होता. रात्री उशिरा ढवळपुरी येथे तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटना माहिती झाल्यानंतर गावातील व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले.