समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या मैत्रिपूर्ण संबंधात तणाव, यादव समुदायाची मते ट्रान्सफर झाले नाही : मायावती

मोदी सरकारचा वारू रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक युती करणाऱ्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या मैत्रिपूर्ण संबंधात तणाव निर्माण झाला आहे. निवडणुकांच्या निकालानंतर काही दिवसांतच या दोन्ही पक्षाची युती संपुष्टात येणाऱ्या मार्गावर आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख यांनी मोठं विधान केलं आहे. आमच्या युतीमुळे निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. यादव समुदायाची मते ट्रान्सफर झाले नसल्याचेही मायावती यांनी म्हटले आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आपली पत्नी आणि भावालादेखील निवडून आणू शकले नाहीत, असे मायावती यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षात अंतर पडले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मायावती युती अबाधित ठेवण्यासाठी इच्छुक नसल्याचे समजते. मायावती यांनी अखिल भारतीय स्तरावर पक्षातील नेत्यांची आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत, बसपच्या पराभवाची जबाबदारी आणि कारणे या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत मायावतींनी ईव्हीएममध्ये गडबडी असल्याचाही आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती येथील नवनिर्वाचित बसप खासदार राम शिरोमणी वर्मा यांनीही ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा आरोप बैठकीपूर्वीच केला आहे. तसेच, बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका घेण्यात याव्यात, असेही वर्मा यांनी म्हटले. दरम्यान, मायावती यांनी बोलावलेल्या बैठकीला नवनिर्वाचित खासदार, झोन निरीक्षक, जिल्हाध्यक्ष यांसह प्रमुख नेते सहभागी झाले होते. तर, बैठकीपूर्वीच मायावती यांनी सहा राज्यातील लोकसभा निवडणुकांची जबाबदारी असलेल्या प्रभारींची पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये, उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.