‘ते’ पत्र खोडसाळपणाचा भाग , मोदींना कोणताही धोका नसल्याचा पोलीसांचा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पत्र समोर आले आहे. दरम्यान, 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र भाजपा कार्यालयात आले होते. परंतु तपासानंतर कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या नावे भाजपा कार्यालयात 29 मे रोजी एक पत्र आले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच राजेश सैनी असे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नावही त्यात लिहिण्यात आले होते. त्यानंतर सैनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. त्या चिठ्ठीवर ती पाठवणाऱ्याचा पत्ताही लिहिण्यात आला होता. तसेच या धमकीपत्रातचार जणांच्या नावांच्या उल्लेखही होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरमधील होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत विषय असल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी त्या पत्रात नमूद केलेल्या पत्त्यावर तपास केला. तसेच चार जणांची चौकशीदेखील केली. परंतु त्या ठिकाणी असलेले कोणीही या घटनेत सहभागी नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश दाधिच यांनी दिली. कोणीतरी असे पत्र पाठवून खोडसाळपणा केला असल्याचेही दाधिच यांनी बोलताना सांगितले.