लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी राहुल गांधींना लिहिले पत्र !!

लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी राहुल गांधींना पत्र लिहिलं असून या पत्रात खचून न जाता धैर्याने पक्षाची जबाबदारी घेण्याचा संदेश सोनिया यांनी राहुल गांधींना दिला आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी एक निर्भिड नेता असून पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी त्याने घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत असं मत सोनिया गांधींनी व्यक्त केलं आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या धाडसी नेतृत्वाचं कौतुक करतोय. असेही या पात्रात सोनियांनी नमूद केले आहे .
लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षश्रेष्ठींनी अनेकदा विनवण्या करूनही आपला राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींनी नकार दिला. अशावेळी सोनिया गांधींनी राहुल गांधींना तीन पानी पत्रं लिहिलं आहे. ‘ राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकांमध्ये निर्भिडपणे पक्षासाठी प्रचार केला आहे. ज्या परिस्थितीत राहुल गांधींनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
येणाऱ्या काळात पक्षासमोरील आव्हानांना समजून पावलं उचलण्याची सूचनाही या पत्रात सोनिया गांधींनी राहुल गांधींना केली आहे. लोकसभा प्रचारादरम्यान राहुल गांधींनी अहोरात्र मेहनत घेतली असल्याचा उल्लेखही सोनिया गांधींनी या पत्रात केला आहे. ‘ राहुल गांधींनी प्रचारादरम्यान अहोरात्र मेहनत घेतली. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मोदी सरकारविरोधात लोकांना जागरूक करण्याचं काम केलं आहे. गोरगरिबांच्या, वंचितांच्या प्रश्नांना राहुल यांनी वाचा फोडली आहे’. संकटाच्या काळामध्ये राहुल गांधींनी काँग्रेसला एकत्र ठेवण्याचं शिवधनुष्यही पेललं असल्याचं या पत्रात सोनियांनी म्हटलं आहे.
येत्या पाच वर्षात सक्रियपणे विरोधीपक्षाची कामगिरी बजावण्याचं आव्हानही सोनियांनी या पत्रात केलं आहे. देशातील सामान्य नागरिकाची नस ओळखून त्याच्या प्रश्नांना संसदेत मांडायला हवं असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. राहुल गांधींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सोनियांनी हे पत्र लिहिलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.