ममता बॅनर्जींना हादरा; ६० नगरसेवक आणि २ आमदार भाजपात

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना हादरा बसला असून पक्षाच्या ६० नगरसेवकांनी आणि दोन आमदारांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय डाव्या पक्षांमधील एका आमदारानेही भाजपात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून यात तृणमूल काँग्रेसने २२ तर भाजपाने तब्बल १८ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. विशेष म्हणजे २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे फक्त दोन खासदार होते. भाजपाची यंदाची कामगिरी तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसमधील नेतेमंडळी भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे दिसते. मंगळवारी सुभ्रांशू रॉय, तुषारक्रांती भट्टाचार्य आणि डाव्या पक्षांमधील आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपात प्रवेश केला. दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.सुभ्रांशू हे मुकुल रॉय यांचे चिरंजीव आहेत.
लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडली. त्याच पद्धतीने आता पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांमधील नेतेही सात टप्प्यांमध्ये भाजपात दाखल होतील. यातील पहिला टप्पा आज पार पडला, असा दावा विजयवर्गीय यांनी केला.
भाजपाला राज्यात जो मोठा लाभ झाला आहे त्यात डाव्यांच्या मतांचा वाटा भाजपाकडे आलेला दिसत आहे. डाव्यांना २०१४ मध्ये ३९ टक्के मते होती त्यांना यावेळी सुरुवातीला ७ टक्के मिळालेली दिसत होती. आता तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील आमदार भाजपात जात असल्याने पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात तृणमूल विरुद्ध भाजपा हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल काँग्रेसचे ३० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.