ताजी बातमी : पायल तडवी मृत्यू प्रकरणी पतीने व्यक्त केला हत्येचा संशय , पंचनाम्याआधी मृतदेह खाली का आणला ?

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. ‘पायलनं आत्महत्या केली नसावी. तिची हत्या झाली असावी,’ असा आरोप तिच्या पतीनं केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना पायलच्या पतीनं या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला. ‘पायलनं आत्महत्या केली तेव्हा आरोपी डॉक्टर तिथं काय करत होत्या. पोलिसांच्या परवानगीशिवाय तिचा मृतदेह त्यांनी खाली कसा आणला, असा प्रश्न पायलच्या पतीनं उपस्थित केला. एकूण घडामोडी पाहता हे प्रकरण शंकास्पद आहे,’ असं तो म्हणाला. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी निदर्शकांची व पायलच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ‘पायलच्या कुटुंबीयांचं जे काही म्हणणं रास्त आहे. त्या दृष्टीनं संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही सुटणार नाही,’ असं महाजन यांनी स्पष्ट केलं.
वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिनं आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्या अद्याप फरार आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पायलच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी आजही नायर रुग्णालयाबाहेर निदर्शनं केली.