दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील अशी अपेक्षा , पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मोदींना शुभेच्छा

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट होताच जगातल्या विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी इम्रान खान यांनी मोदींना फोन केला. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाकिस्तान विदेश मंत्रलयाकडून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये मोदींसोबत काम करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे’ असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना दिले. पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये पहिल्यांदाच फोनवर चर्चा झाली.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणतात. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धीसाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २३ मे रोजीही ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. दक्षिण आशियात शांतता, समृद्धता आणि विकासासाठी आपल्याला मोदींसोबत काम करायचे आहे असे इम्रान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मोदींनी इम्रान यांचे आभार मानताना मी सुद्धा दक्षिण आशियात शांतता आणि विकासाला प्राधान्य दिले आहे असे म्हटले.