Loksabha 2019 final : 302 वर पोहोचलेला भाजप गेला 303 वर , एनडीए ३५० तर तर युपीएचे मीटर ८२ वर थांबले, काँग्रेस ५२

लोकसभा निवडणुकीत देशातील मतदारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने कौल दिला असून लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून त्यानुसार एनडीएला ३५० तर यूपीएला ८२ जागांवर विजय प्राप्त झाला आहे . २०१९ च्या या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे एकट्या भाजपने ३००हून अधिक जागांची आघाडी घेत ३०३ जागा मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए तसेच उत्तर प्रदेशात स्थापन झालेल्या महाआघाडीची दाणादाण उडाली आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊन २८ तास उलटले असले तरी अद्याप मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. ५४३ पैकी ५४२ जागांवर मतदान झालं होतं. दरम्यान आता सर्वच्या सर्व ५४२ जागांचे अधिकृत निकाल जाहीर झाले आहेत . भाजप ३०३ जागा मिळविणारा पक्ष ठरला आहे.
सतराव्या लोकसभेच्या अंतिम निकालानुसार ५४३ मध्ये भाजपआघाडी३५०,युपीए ८२, महागठबंधन ८२ आणि इतरांमध्ये ९५ जागांचा समावेश आहे.
अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांपैकी अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नव्हता या मतदारसंघात आजही मतमोजणी सुरू होती. केंद्रीय मंत्री व भाजप नेते किरेन रिजिजू आणि काँग्रेसचे नबाम तुकी यांच्यात येथे मुख्य लढत असून २ लाख २३ हजार ३६२ मते घेत रिजिजू यांनी येथे मोठी आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुकी यांना ५० हजार ७२५ मते आतापर्यंत मिळाली आहे. रिजिजू यांनी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तकाम संजय यांचा पराभव केला होता. आता अंतिम निकाल हाती आल्यानंतर ५४२ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपला सर्वाधिक ३०३जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. द्रमुक २३ जागांसह तिसऱ्या स्थानी असून तृणमूल काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेसला प्रत्येकी २२ जागा मिळाल्या आहेत. जागांनिहाय क्रमवारी लक्षात घेता शिवसेना १८ जागांसह देशातील सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यानंतर जदयुला १६, बिजू जनता दलाला १२ तर बसपाला १० जागा मिळाल्या आहेत. बाकी कोणत्याही पक्षाला १० चा आकडाही गाठता आलेला नाही. तेलंगण राष्ट्र समितीला ९, लोकजनशक्ती पार्टीला ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाला प्रत्येकी ५ जागा मिळाल्या आहेत.