अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासह ११ जणांची हत्या, दहशतवाद्यांनी कट रचून घडवला हल्ला

अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली आहे. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संशयित NSCN (नॅशनल सोशालिस्ट काउंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्याच्या मागे हात असल्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात झाली आहे.
अबो अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम जागेवरून आमदार आहेत. त्या दहशतवाद्यांनी तिरोंग अबो यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी पहिल्यांदा अबो यांची हत्या केली. त्यानंतर कुटुंबातील 10 सदस्यांचा खून केला. हा हल्ला नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडच्या दहशतवाद्यांद्वारे करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दोषीवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. एनपीपीनं तिरोंग अबो आणि त्यांचा कुटुंबीयांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध नोंदवला आहे. नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड एक दहशतवादी संघटना आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहे.