नाशिकमध्ये भीषण अपघात, ४ भाविक ठार, ६ जखमी

नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे भाविकांच्या कारला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले. या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. भाविकांची आयशर गाडी नादुरुस्त होती, त्यामुळे रस्त्याच्याकडेला ही कार पार्क करण्यात आली होती. मात्र पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या कारला जोरदार धडक मुलाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथील माणिक ठाकूर हे त्यांच्या २५ ते ३० नातेवाईकांसह रविवारी सप्तश्रृंगी गडाकडे रवाना झाले होते. त्यासाठी त्यांनी आयशर कार बुक केली होती.
दुपारी दीड वाजता धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री साडे आठ वाजता ठाकूर कुटुंबीय परतीच्या प्रवासाला निघाले होते. रात्री नऊ वाजता नांदुरी येथे आल्यानंतर त्यांची कार बंद पडली. काही वेळानंतर कार दुरुस्त करून ती सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर अंतरावर गाडी बंद पडली. त्यानंतर पुन्हा रात्री १२ वाजेच्या सुमारास दहा किलोमीटर अंतरावर वणी-नाशिक मार्गावरील कृष्णगाव येथे ही कार बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या कारची व्यवस्था करण्यासाठी आठ ते दहा भाविक कारच्या खाली उतरले. दुसऱ्या कारची वाट पाहत असतानाच वणीहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या आयशर कारला पाठिमागून जोरदार धडक दिली.
अचानक झालेल्या या अपघातामुळे कारच्या मागे उभे असलेले गणेश भगवती प्रसाद ठाकूर, कुणाल कैलास ठाकूर, सागर अशोक ठाकूर आणि आशिष माणिक ठाकूर हे चारही जण जागीच ठार झाले. हा अपघात प्रचंड भीषण होता. मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेमुळे ही कार २० ते २५ फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. कारमध्ये बसलेले ललीताबाई अशोक ठाकूर, अनिल रमेश ठाकूर, ध्रुप बिंद्राबन ठाकूर, रंजिता ध्रुप ठाकूर, माणिक चिंतुलाल ठाकूर आणि पल्लवी ठाकूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून इतर दहा ते बाराजणांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर जखमी भाविकांनी प्रचंड आक्रोश केल्याने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.