तिसऱ्या आघाडीचे सरकार आणण्यासाठी चंद्राबाबू सक्रिय , घेतली पवारांची भेट

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्साहाने केंद्रात बदल करण्यासाठी जोरबैठका सुरु केल्या असून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आघाडी सरकार बनविण्यासाठी विरोधकांनी आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रातही “कर्नाटक फॉर्म्यु”ला राबवण्याच्या शक्यतेवर विरोधक विचार करत असून या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर ते समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचीही भेट घेणार आहेत. नायडू यांच्या या हालचाली तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेकडे वाटचाल करणाऱ्या दिसत आहेत. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देऊन सत्तेत येण्यासाठी देशभरातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
१९८९ प्रमाणेच तिसऱ्या आघाडीचे सरकार यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे. टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि डाव्या आघाडीच्या सीताराम येचुरींची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी नायडू दिल्लीत धडकले. शुक्रवारी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. राहुल गांधींची भेट घेण्यासाठी आज सकाळीच चंद्राबाबू नायडू त्यांच्या घरी पोहोचले आहेत. निकालांनंतर आघाडी करता येईल का याबद्दल गांधी यांच्याशी नायडू चर्चा करणार आहेत. गांधीची भेट घेऊन नायडू लखनऊ येथे बसपा प्रमुख मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांची देखील भेट घेणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना भेटून आगामी निकालांवर चर्चा करणार आहे. २३ मेला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तेव्हा भाजप दिल्लीचे तख्त राखतं की चंद्राबाबूंच्या आघाडीच्या प्रयत्नांना यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.