परकीय आक्रमकांनी दिलेला शब्द ” हिंदू ” म्हणवून घेण्यापेक्षा ” भारतीय ” म्हणवून घेणेच योग्य : कमल हासन

‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिल्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांनी आणखी एक विधान केलं आहे. ‘हिंदू’ या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नाही. हा शब्द परकीय आक्रमकांनी आपल्याला दिला आहे,’ असं सांगतानाच ‘आक्रमकांनी दिलेला हा शब्द वापरण्याऐवजी आपण स्वत:ला भारतीय म्हणून घेतलं पाहिजे,’ असा सल्ला कमल हासन यांनी दिला आहे.
कमल हासन यांनी ट्विटरवर तामिळ भाषेत ट्विट करून हा सल्ला दिला आहे. ‘कोणत्याही प्राचीन ग्रंथांमध्ये ‘हिंदू’ हा शब्द आढळत नाही. मोगलांसहित इतर आक्रमकांनी आपल्याला हा शब्द दिला आहे. ‘हिंदू’ या शब्दाला कोणत्याही धर्माशी जोडणं चुकीचं आहे. आपली खरी ओळख भारतीय अशीच आहे, हिंदू नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलंय. अलवर ते नयनमार आणि शैव ते वैष्णवांनीही हिंदू शब्दाचा प्रयोग केलेला नाही. आक्रमकांनी हा शब्द दिला आणि आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी हा शब्द रेटून नेला, असंही त्यांनी म्हटलंय.