मोदींनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचा विश्वास

२३ मे रोजी निकालानंतर संपूर्ण बहुमतासहीत भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येणार, यावर मला विश्वास असल्याचे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांतील आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत केले.
यावेळी मोदी म्हणाले की, भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशानं छाप सोडली पाहिजे असं मला वाटतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे. सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले आहेत. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
याआधी काहींना देशाचं नेतृत्त्व एक-दोन वर्षांसाठी सत्ता मिळाली किंवा एका परिवाराला सत्ता मिळाली. मात्र लोकांनी बहुमताने निवडलेलं सरकार पाच वर्षे चाललं ही बाब अनेक वर्षांनी घडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आभार मानले.
माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता हेच मी मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. आम्हाला जनतेचा आशीर्वाद हवा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आम्ही देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत आमच्या योजना पोहचवल्या याचा आम्हाला गौरव वाटतो.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भाजपची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी मोदींना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याचं त्यांनी टाळल्याचं पहायला मिळालं.
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहितीही दिली. मात्र त्यानंतर पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता “अध्यक्षजी जवाब देंगे” असं म्हणत मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं.
मोदींची पत्रकार परिषद, ऐतिहासिक घटना : राहुल
याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील पत्रकार परिषद सुरु होती. “पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना आहे”, या शब्दात राहुल गांधींनी मोदींच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच “मोदी जिथे पत्रकार परिषद घेत आहेत, त्या खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे”, असा आरोपही केला आहे.