‘प्रत्येक धर्मामध्ये दहशतवाद असतो याला इतिहास साक्ष आहे ‘ मला असे म्हणायचे होते : कमल हासन

अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी काही दिवसांपूर्वी ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, आणि तो हिंदू होता ‘असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता ‘प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो’, असं वक्तव्य करत कमल हासन यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
“दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो. इतिहासामध्ये असे अनेक दहशतवादी आहेत जे वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. मी देखील हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो. त्यामुळे आपण कोणत्याही जाती-धर्मावर आरोप-प्रत्यारोप करु शकत नाही. अमूक एक धर्म आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा नीच आहे असं आपण म्हणून शकत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक धर्मामध्ये दहशतवाद असतो याला इतिहास साक्ष आहे. त्या दिवशीदेखील मी हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होतो”, असं कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.