नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही, देशाची काळजी तुम्ही काय घेणार ? ममतांचा प्रहार

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलेले असताना तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत पातळीवर टीका करून मोदींना सत्तेवरून पाय उतार करण्याचे आवाहन केले.
नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार ? अशा शब्दात त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. त्यांनी बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींना एकही मत देऊ नका असे सांगतानाच मोदींना हटवण्याचे आवाहन केले. भाजपा आणि तृणमुल काँग्रेसकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे.
निवडणूक आयोग भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला आहे. ममता म्हणाल्या, मोदींच्या गुरुवारी दोन रॅली आहेत. आयोगानं ज्या पद्धतीनं प्रचाराची वेळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तो संशयास्पद आहे. खरं तर निवडणूक आयोग निष्पक्षरीत्या काम करत नाही. टीएमसीच्या तक्रारींकडे निवडणूक आयोग जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचाराला भाजपा जबाबदार आहे. भाजपानं बाहेरच्या गुंडांना बोलावलं होतं. ज्याचा परिणाम कोलकात्यात झाला. आयोगानं राज्य सरकारला अंधारात ठेवून प्रचाराची वेळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये मी कोणत्याही प्रकारची हिंसा सहन करणार नसल्याचंही ममता म्हणाल्या आहेत. बंगाल म्हणजे बिहार, यूपी किंवा त्रिपुरा नाही, बंगाल हे बंगाल आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.