पत्नी आणि लहान मुलीच्या मानेला तलवारी लावून , श्रीरामपुरात धाडसी दरोडा , १० लाखांचा ऐवज लुटला

श्रीरामपूर शहरातील एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीने सशस्रहल्ला करून २८ तोळे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल, कॉम्प्युटर, असा दहा लाखांचा ऐवज लुटून नेला. खिडकीचे गज कापून दरोडेखोर बंगल्यात घुसले आणि थेट प्रवेश बेडरुममध्ये झोपलेले व्यापारी, त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीच्या मानेला तलवारी लावून भयभीत केले. या घटनेने श्रीरामपूर शहरात एकच खळबळ माजली आहे.
‘तेल व मैदा’ याचे होलसेल व्यापार करणारे चंदन बालानी यांचा श्रीरामपूर शहरात थत्ते मैदानं परिसरात अलिशान बंगला आहे. या बंगल्यावर बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारात पाच दरोडेखोर असलेल्या एका टोळीने सशस्र हल्ला केला. ‘तुम्हाला काय न्यायचे ते घेऊन जा पण आम्हाला मारू नका, अशी विनवणी करुन विशाखा बालानी यांनी अंगावरील सोन्याची दागिने स्वतःहून दरोडेखोरांच्या हवाली केले.
तिजोरीची चावी घेऊन लॉकरमधील सोने, रोख रक्कम ५० हजार, मोबाइल फोन, कॉम्प्युटर, असा दहा लाखांचा ऐवज लुटला आणि दरोडेखोर पळून गेले. दरोडेखोर पळून गेल्यावर भयभीत झालेल्या व्यापाऱ्याने पोलिसांना कळविले. श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या दरोड्याचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.