कंगनाच्या विरोधात आदित्य पांचोलीची वर्सोवा पोलिसात धाव

सिनेअभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्यातील वादाला नवीन वळण लागले आहे. आदित्य पांचोलीने कंगनाविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीच्या उत्तरादाखल आदित्यने ही तक्रार केली आहे. कंगनाच्या वकिलांनी माझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती, असे त्याने सांगितले.
कंगना आणि आदित्य पांचोली बऱ्याच काळापासून एकमेकांविरोधात वक्तव्य करत आहेत. ‘रेस-२’ या चित्रपटादरम्यान आदित्य पांचोलीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप कंगनाने एका मुलाखतीत केला होता. यानंतर उभयतांत वादाला तोंड फुटले. आता आदित्य पांचोलीने कंगना रणौत विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, कायद्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
कंगना आणि तिची बहिण रंगोली यांनी लैंगिक शोषणासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीविरोधात आदित्यने वर्सोवा पोलीस ठाण्यात संबंधित एफआयआर नोंदवला आहे. तसेच काही व्हिडीओ आणि फोन रेकॉर्डिंग हे पुरावे म्हणून पोलिसात जमा केले आहेत.